राज्यातील पिकांची उत्पादकता वाढावी यासाठी अनेक शेतकरी नवनवीन पद्धतींचे प्रयोग करत असतात. अशा प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी विशेष गौरव पुरस्कार देते. याच उद्देशाने तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर पीक स्पर्धांचे आयोजन केले जाते.
यंदाच्या रब्बी हंगामासाठीही स्पर्धा जाहीर करण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर निश्चित केली आहे. राज्य स्तरावर सर्वोच्च उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजारांचा मानाचा पुरस्कार मिळणार आहे. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणखी वाढीस लागावे, ही कृषी विभागाची अपेक्षा आहे.
कोणाला किती बक्षीस?
राज्य स्तरावर: प्रथम क्रमांक – ₹५०,०००, द्वितीय क्रमांक – ₹४०,०००, तृतीय क्रमांक – ₹३०,०००
जिल्हा स्तरावर: प्रथम – ₹१०,०००, द्वितीय – ₹७,०००, तृतीय – ₹४,०००
तालुका स्तरावर: प्रथम – ₹४,०००, द्वितीय – ₹३,०००, तृतीय – ₹२,०००
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
(1) प्रवेश शुल्क भरल्याची पावती, (2) 7/12 आणि 8A उतारा, (3) जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), (4) घोषित क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा, (5) बँक पासबुकची प्रत, (6) पात्रता आणि अटी
सर्वसाधारण व आदिवासी श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि जवस ही पाच पिके स्पर्धेत समाविष्ट आहेत. एकाच शेतकरीाला इच्छेनुसार एकापेक्षा जास्त पिकांसाठीही प्रवेश घेता येईल. मात्र, संबंधित पिकाखाली किमान एक एकर सलग क्षेत्र असणे बंधनकारक आहे.
“उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन कृषी संचालक यांच्याकडून करण्यात आले आहे.