December Weather Forecast Maharashtra: डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील हवा अक्षरशः थंड झुळुकींनी भारून जाईल, असा अंदाज प्रख्यात हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. ३ आणि ४ डिसेंबरला राज्यावर हवेचा दाब उत्तर भागात सुमारे १०१२ hPa तर दक्षिण भागात १०१० hPa राहणार आहे. हवेच्या दाबातील या हलक्या बदलांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडी अधिक तीव्र जाणवेल, तर मध्य आणि दक्षिण जिल्ह्यांमध्ये थंडी मध्यम स्वरूपात अनुभवायला मिळणार आहे. थंडी हळूहळू वाढण्याचा हा टप्पा जणू हिवाळ्याची खरी चाहूल देणारा ठरणार आहे.
५ आणि ६ डिसेंबरला मात्र परिस्थिती अधिक बदलणार आहे. या कालावधीत उत्तर भागात हवेचा दाब १०१४ hPa पर्यंत वाढेल. मध्य व दक्षिण भागावरही १०१२ hPa चा प्रभाव राहील. या वाढलेल्या दाबामुळे दिवसा हलक्या ऊन्हासोबत थंडगार हवा आणि रात्री एकदम जाणवणारा गारवा, अशा दोन्ही तापमानांमध्ये स्पष्ट घट दिसून येईल. थंडीची लाट उत्तर महाराष्ट्रात अधिक तीव्र राहील, त्यामुळे नाशिक, धुळे, जळगावासारख्या जिल्ह्यांत थंडीचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
याचदरम्यान, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात ६, ७ आणि ८ डिसेंबरच्या आसपास हवामान ढगाळ राहू शकतं. पहाटे आणि सकाळी धुक्याची पातळी थोडी वाढू शकते, ज्यामुळे दृश्यमानतेत घट होण्याचीही शक्यता आहे. अनेक शेतकरी या काळात गारपीट होण्याचा प्रश्न विचारत होते; पण त्यावर डॉ. साबळे यांनी त्यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे की, सध्याच्या वातावरणात गारपीटीची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही.
जागतिक हवामान परिस्थितीचाही या अंदाजावर मोठा परिणाम होताना दिसतो. हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील पृष्ठभाग तापमान सुमारे २९°C पर्यंत राहणार आहे. या तापमानातील सौम्य घसरण म्हणजे मोठे हवामान बदल किंवा वादळी परिस्थिती घडण्याचा धोका नाही, हेच दाखवते. विशेष म्हणजे, प्रशांत महासागरात पेरू-इक्वाडोर भागात तापमान वाढताना दिसत असल्याने La Niña चा प्रभावही आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हिवाळा स्थिर राहण्याची आणि हवामानात अचानक बदल न होण्याची शक्यता अधिक आहे.
थोडक्यात सांगायचं तर, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात थंडी निश्चितपणे वाढणार असली तरी पाऊस किंवा गारपीट यांचा कोणताही धोका नाही. हवामान स्थिर राहणार असल्याने ग्रामीण भागातील शेतीपद्धती, फळबागा आणि रब्बी हंगामावरही याचा सकारात्मक परिणाम होईल. शेतकरी, विद्यार्थी, दवंडीवर काम करणारे मजूर आणि सर्वसामान्य नागरिक, सर्वांनीच थंडीच्या वाढत्या प्रभावानुसार थोडी काळजी घ्यावी इतकंच.