CIDCO flats Navi Mumbai : नवी मुंबईकरांसाठी सिडकोने यंदा मोठी खुशखबर दिली आहे. सिडकोकडून पहिल्यांदाच ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीनुसार तब्बल 4,508 घरांची जबरदस्त गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे या योजनेसाठी लॉटरी किंवा सोडत नाही. या योजनेचे ऑनलाइन अर्ज भरायला शनिवारपासून म्हणजेच 22 नोव्हेंबर, दुपारी 4 पासून सुरुवात झाली असून इच्छुकांना तात्काळ अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. सिडकोची ही घरे प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत EWS आणि LIG गटांसाठी राखीव आहेत. नवी मुंबईत असलेल्या तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या लोकप्रिय भागात सिडकोची ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे सिडकोकडून पहिल्यांदाच तुम्हाला तुमचे पसंतीचे घर स्वतः निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादी सदनिका आवडली, तर थेट बुकिंगची सुविधा आहे. या सुविधेमुळे सिडकोची ही योजना आणखी खास आणि ग्राहकांसाठी आकर्षक ठरत आहे.
घरावर अडीच लाखाचे अनुदानही मिळणार
सिडकोने नेहमीच सर्वांना परवडणारी घरे मिळावीत यासाठी प्रयत्न केले आहेत. याच पार्श्वभूमीवर सिडकोने तळोजा, द्रोणागिरी, घणसोली, खारघर आणि कळंबोली या भागांतील 4,508 एवढ्या घरांची विक्री आता सुरू केली आहे. यातून 1,115 घरे EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी, तर 3,393 घरे LIG म्हणजे अल्प उत्पन्न गटासाठी ठेवण्यात आली आहेत. यात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे EWS गटातील अर्जदारांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तब्बल 2.50 लाखांचं अनुदानही मिळणार आहे. त्यामुळे घर घेण्याचा खर्च आणखी कमी होणार आहे.
या योजनेतील प्रत्येक घर रेडी टू मूव्ह असल्याने अर्जदारांना ताबडतोब राहायला जाण्याची सुविधाही आहे. आणखी एक खास बाब म्हणजे इच्छुकांना आपल्या पसंतीचं घर स्वतः निवडता येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया देखील खूप सोपी ठेवण्यात आली आहे. घरे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या पद्धतीनुसार दिली जाणार असून, सदनिकेची पूर्ण रक्कम भरताच तात्काळ ताबा देण्यात येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर पात्र अर्जदारांना त्यांना आवडणारी सदनिका निवडण्याची संधी मिळेल.
या योजनेतील सर्व घरे नवी मुंबईतील पूर्ण विकसित नोड्समध्ये असल्याने, दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या जवळपास सर्व सुविधा येथे सहज मिळतात. त्याहूनही खास म्हणजे हे प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असल्यामुळे हे लोकेशन आकर्षक आहे. याशिवाय, उपनगरीय रेल्वे, मेट्रो आणि प्रमुख महामार्गांचे उत्तम जाळे असल्याने या भागांची कनेक्टिव्हिटी उत्कृष्ट आहे. त्यामुळे कामावर, शहरात किंवा विमानतळावर जाण्यासाठीचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि जलद होतो.
नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती
नवी मुंबईतील द्रोणागिरी, तळोजा, खारघर, घणसोली आणि कळंबोली या वेगाने विकसित होत असलेल्या नोड्समध्ये सिडकोने एकूण 4,508 ईडब्ल्यूएस (EWS) आणि एलआयजी (LIG) घरांची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक प्रकल्पाचे लोकेशन, चटई क्षेत्र आणि किंमत वेगवेगळी आहे. त्यामुळे अर्जदारांना आपल्या बजेटनुसार योग्य घर निवडण्याची मुभा मिळते. ही सर्व घरे पूर्णपणे रेडी टू मूव्ह असल्याने, नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात परवडणाऱ्या दरात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. खालीलप्रमाणे तुम्ही लोकेशननुसार EWS आणि LIG सदनिकांची उपलब्धता, चटई क्षेत्र आणि किंमत पाहू शकता:
(1) द्रोणागिरी :
द्रोणागिरीमधील सेक्टर 11 मधील प्लॉट नं.1 आणि सेक्टर 12 मधील प्लॉट नं.63 आणि 68 या प्रकल्पांत EWS आणि LIG मिळून एकूण 540 पेक्षा जास्त घरे उपलब्ध आहेत. EWS साठी चटई क्षेत्रफळ सुमारे 25.81 चौ.मी. आहे. तर LIG साठी चटई क्षेत्रफळ 29.82 चौ.मी. एवढे आहे. या घरांच्या किमती EWS कॅटेगिरी मधील घरांची किंमत 22 लाख 18 हजार रुपये तर LIG कॅटेगिरी मधील घरांची किंमत 30 लाख 17 हजार रुपये एवढी आहे. द्रोणागिरी हे नवी मुंबई विमानतळाच्या जवळ असल्याने भविष्यातील लोकेशन व्हॅल्यू येथे प्रचंड वाढणार आहे.
(2) तळोजा :
तळोज्यात सेक्टर 21, 22, 27, 34, 3, 36 आणि 37 या प्रकल्पांत EWS आणि LIG मिळून सुमारे 3,000 पेक्षा जास्त घरांचे मोठे क्लस्टर उपलब्ध आहे.
EWS घरांचे चटई क्षेत्र साधारण 25.56 ते 25.81 चौ.मी., तर LIG साठी 29.60 ते 29.82 चौ.मी. आहे.
किंमती पाहिल्यास—EWS कॅटेगरीतील घरांची किंमत 21 लाख 71 हजार रुपये ते 23 लाख 59 हजार रुपये पर्यंत आहे. तर LIG कॅटेगरीतील घरांची किंमत 30 लाख 58 हजार रुपये ते 34 लाख 40 हजार रुपये एवढी आहे. तळोजा मेट्रो, महामार्ग, औद्योगिक क्षेत्र आणि शाळा–कॉलेजच्या जवळ असल्यामुळे वेगाने विकसित होत असून, नवी मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या परवडणाऱ्या परिसरांपैकी एक मानला जातो.
(3) खारघर :
खारघरमधील सेक्टर 40, प्लॉट नं.1 या प्रकल्पात EWS आणि LIG मिळून 139 सदनिका उपलब्ध आहेत.
येथे EWS घरांचे चटई क्षेत्र 25.81 चौ.मी., तर LIG घरांचे चटई क्षेत्र 29.82 चौ.मी. आहे.
किंमतींच्या दृष्टीने—EWS घरांची किंमत 26 लाख 49 हजार रुपये, तर LIG घरांची किंमत 37 लाख 95 हजार रुपये निर्धारित करण्यात आली आहे. खारघर हे नवी मुंबईतील सर्वात प्रीमियम लोकेशन्सपैकी एक असून, येथे शैक्षणिक संस्था, ऑक्सिजन पार्क, मॉल्स आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीमुळे घरांच्या किमती भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
(4) कळंबोली :
कळंबोलीमधील सेक्टर 15, प्लॉट नं.9 या प्रकल्पात EWS आणि LIG मिळून 24 घरे उपलब्ध आहेत.
येथील EWS घरांचे चटई क्षेत्र 25.81 चौ.मी., तर LIG घरांचे चटई क्षेत्र 29.82 चौ.मी. इतके आहे.
किंमत पाहिल्यास—EWS घरांची किंमत 26 लाख 32 हजार रुपये, तर LIG घरांची किंमत 37 लाख 47 हजार रुपये आहे. कळंबोली हे नवी मुंबईतील प्रमुख जंक्शन असल्याने Sion–Panvel Highway, एक्सप्रेसवे, रेल्वे आणि मेट्रोमुळे प्रवास अत्यंत सोपा होतो. त्यामुळे हा परिसर गुंतवणुकीसाठीही उत्तम मानला जातो.
(5) घणसोली :
घणसोलीतील सेक्टर 10 मध्ये LIG गटातील 2 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. येथील LIG चटई क्षेत्र 29.82 चौ.मी. असून, या घरांची किंमत 36 लाख 72 हजार रुपये एवढी आहे. घणसोली MIDC, आयटी पार्क, रेल्वे स्टेशन आणि व्यावसायिक केंद्रांच्या जवळ असल्यामुळे इथे घरांना नेहमीच चांगली मागणी असते. कामकाज करणाऱ्या लोकांसाठी हा परिसर विशेष पसंतीचा आहे.
येथून करा घरासाठी अर्ज
सिडकोच्या https://cidcofcfs.cidcoindia.com या पोर्टलवर अर्ज करू शकता. तसेच यावर घरांची सर्व माहिती जसे की क्षेत्रफळ, किंमत आणि इतर आवश्यक तपशील सर्व काही इथे सहज पाहता येणार आहे. आपण देखील या घरांच्या किमतीबद्दल माहिती खाली दिलेली आहे.
आवश्यक कागदपत्रे
सिडकोच्या घरांसाठी अर्ज करताय? मग अर्ज भरण्यापूर्वी तुमच्याकडे कोणती कागदपत्रे तयार असायला हवी, हे आधीच समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण सर्व कागदपत्रे नीट नसतील, तर अर्ज अपूर्ण ठरू शकतो. खाली दिलेल्या लिस्टनुसार तुम्ही तुमची तयारी सहज करू शकता. चला तर मग, एक-एक करून पाहूया काय-काय लागणार आहे:
(1) आधारकार्ड – स्वतःचं आणि तुमच्या पत्नी/पतीचं आधारकार्ड—ही दोन कागदपत्रं अनिवार्य आहेत. ओळख आणि पत्त्याचा प्राथमिक पुरावा म्हणून यांचा वापर होतो.
(2) पॅनकार्ड : स्वतःचा आणि जोडीदाराचा पॅनकार्ड देखील आवश्यक आहे. हे आर्थिक व्यवहारांसाठी आणि पडताळणीसाठी खास आवश्यक दस्तऐवज आहे.
(3) सर्व कागदपत्रे DG-Locker मध्ये असणे आवश्यक DG Locker मध्ये कागदपत्रे सेव्ह करून ठेवली तर अर्ज भरताना अपलोड करणे खूपच सोपे होते. शिवाय ही कागदपत्रे अधिकृतरीत्या वैध मानली जातात.
(4) उत्पन्नाचा दाखला / Income Proof (2024–25) : तुमच्या घरातील एकत्रित वार्षिक उत्पन्न दाखवणारा दस्तऐवज आवश्यक आहे. यामध्ये फक्त तुम्ही आणि तुमची पत्नी/पती यांचे उत्पन्न विचारात घेतले जाईल. उत्पन्न दाखल्यासाठी दोन पर्याय आहेत: 2024–25 वर्षाचा ITR किंवा तहसीलदारांचे उत्पन्न प्रमाणपत्र.. हा दाखला 01/04/2024 ते 31/03/2025 या 12 महिन्यांच्या उत्पन्नाचा पुरावा देणारा असायला हवा.
(5) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) : हे प्रमाणपत्र 01 जानेवारी 2018 नंतरचे आणि बारकोडसह असणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात हे सिद्ध होते.
(6) जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र : जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात (SC, ST, NT, DT इ.) अर्ज करणार असाल, तर खालील दोन्ही दस्तऐवज अनिवार्य आहेत.. महत्वाचे : इतर राज्यातील जात वैधता प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही.
(7) UDID कार्ड (अपंगत्व प्रमाणपत्र)
जर अर्जदार दिव्यांग प्रवर्गात असेल, तर UDID – Unique Disability ID Card सादर करणे आवश्यक आहे.
(8) इतर आरक्षण प्रवर्गांसाठी लागणारी कागदपत्रे
खालील विशेष प्रवर्गांमध्ये अर्ज करताना काही अतिरिक्त कागदपत्रे आवश्यक आहेत:
(अ) पत्रकार – जोडपत्र – 1 मध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील.
(ब) माथाडी कामगार – संबंधित माथाडी मंडळाने दिलेला अधिकृत दाखला/प्रमाणपत्र.
(क) प्रादेशिक अल्पसंख्यांक (Regional Minority) –अर्जदाराच्या धर्माचा उल्लेख असलेला खालीलपैकी कोणताही दस्तऐवज : शाळा सोडल्याचा दाखला (LC) जन्म दाखला
(ड) प्रकल्पग्रस्त (Project Affected) – वंशावळ, तसेच संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र.
(इ) सिडको कर्मचारी – सिडकोतर्फे अधिकृत प्राधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र.
(ई) माजी सैनिक (Ex-Servicemen) – पोर्टलवर उपलब्ध फॉर्ममध्ये माहिती भरून, सक्षम प्राधिकाऱ्याची सही आणि शिक्का घेऊन अपलोड करणे आवश्यक.
(उ) शासकीय कर्मचारी – किमान 5 वर्षे शासकीय सेवेत पूर्ण केलेले अधिकारी/कर्मचारी पात्र. अर्ज करताना पोर्टलवरील फॉर्ममध्ये माहिती भरून संबंधित अधिकाऱ्यांची सही व शिक्का असलेले प्रमाणपत्र अपलोड करावे.
जर ही सर्व कागदपत्रे तयार ठेवली, तर अर्ज भरताना कोणताही त्रास होणार नाही. प्रक्रिया सोपी आहे, आणि सर्व दस्तऐवज DG-Locker मध्ये असल्यास अर्ज आणखी जलद भरता येतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही लिस्ट एकदा नीट चेक करा आणि खात्री करा की आवश्यक सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत.
नवी मुंबईसारख्या जलद गतीने विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात परवडणाऱ्या किंमतीत घर मिळण्याची ही आणखी एक मोठी संधी आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा व्यापक प्रमाणावर फायदा घ्यावा, असा संदेश नागरिकांना सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिला.
सिडकोची माहिती पुस्तिका येथे क्लिक करून पहा
सर मला घर खरेदी करायचे आहे म्हाडा चे प्लीज माझे नाव नोंद करा