खुशखबर! मुंबईत म्हाडाची जाहिरात लवकरच.. फक्त ‘या’ दोन कागदपत्रांवर म्हाडाचे घर मिळणार..!

MHADA flats Mumbai : मुंबईतील म्हाडाच्या घराच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर.. मुंबईत म्हाडाची नवीन जाहिरात अगदी लवकर जाहीर होणार आहे आणि यावेळी प्रक्रिया आणखी सोपी झाली आहे. फक्त दोन महत्त्वाच्या कागदपत्रांवर तुम्हाला म्हाडाचे घर मिळणार आहे. या बदलामुळे अर्जदारांची कागदपत्रांसाठी होणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, सामान्य कुटुंबांनाही घर घेण्याची प्रक्रिया सहज समजण्यास आणि पूर्ण करण्यास मदत होणार आहे. नेमकी कोणती आहेत ती दोन आवश्यक कागदपत्रे? नवीन जाहिरात कधी येणार? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..

जाहिरात कधी? कोणती दोन कागदपत्रे लागणार?

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून सोडतीत रिक्त राहिलेली सुमारे १२५ घरे आता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या विशेष योजनेद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारीही वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे, या योजनेत अर्ज करणाऱ्या नागरिकांना नेहमीप्रमाणे मोठ्या कागदपत्रांची फाईल घेऊन धावपळ करण्याची आवश्यकता राहणार नाही. या प्रक्रियेत फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे नोंदणी करून इच्छुक अर्जदारांना घरासाठी अर्ज करता येईल. मात्र, सामाजिक आरक्षणाच्या गटातील काही घरे राखीव असल्याने त्या श्रेणीत अर्ज करणाऱ्यांना जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्यपणे सादर करावे लागणार आहे.

ताडदेव, वडाळा, तुंगा पवई आणि काही इतर भागातील म्हाडाची उच्चदराची घरे वारंवार म्हणजेच दोन किंवा अधिक वेळा सोडत काढूनही विकली गेली नाहीत. परिणामी, ही घरे रिकामी पडून असून मुंबई मंडळावर आर्थिक ताण वाढत आहे. केवळ विक्री न होण्याचाच नाही, तर या रिक्त घरांच्या देखभालीचा खर्चही मंडळालाच उचलावा लागत आहे.

येथे वाचा – म्हाडा लॉटरीच बरी..  BMC ची घरांची लॉटरी फ्लॉप? 426 घरांसाठी फक्त 1943 अर्ज

या परिस्थितीचा विचार करून, नियमानुसार दोनपेक्षा अधिक वेळा सोडत होऊनही न विकले गेलेली ही घरे आता ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय म्हाडाने मंजूर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई मंडळाने प्रत्यक्षात सुरुही केली आहे.

मुंबई मंडळाच्या पणन विभागाने अशा सुमारे १२५ रिक्त घरांची यादी तयार केली आहे, ज्यातील बहुतेक घरे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील आहेत. या घरांच्या नव्या किंमती ठरवण्याचे काम सध्या सुरू असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली. त्यांचे म्हणणे आहे की, किंमती अंतिम झाल्यानंतर या घरांची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर त्यांची विक्री ‘प्रथम प्राधान्य’ योजनेतून करण्यात येणार आहे.

म्हाडाने या कठोर अटी काढल्या

‘प्रथम प्राधान्य’ योजनेत म्हाडाने सोडतीतील अनेक कठोर अटी मोठ्या प्रमाणात सैल केल्या आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इच्छुक व्यक्तीच्या नावावर महानगरपालिका क्षेत्रात, राज्यात किंवा देशात कुठेही स्वतःचे किंवा सरकारी योजनेंतर्गत मिळालेले घर असले तरी, त्याला या योजनेतून घर घेण्यास हरकत राहणार नाही. तसेच उत्पन्नाची मर्यादाही पूर्णपणे हटवण्यात आली आहे.

परंपरागत म्हाडा अर्जासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, आयकर विवरणपत्र, निवासी दाखला आणि इतर अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. पण ‘प्रथम प्राधान्य’ योजनेसाठी प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली असून, अर्जदाराला फक्त आधारकार्ड आणि पॅनकार्ड सादर करावे लागणार आहेत. मात्र सामाजिक आरक्षणाच्या घरांसाठी अर्ज करताना आधार आणि पॅनसोबत जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र अनिवार्य असेल, अशी माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

15 thoughts on “खुशखबर! मुंबईत म्हाडाची जाहिरात लवकरच.. फक्त ‘या’ दोन कागदपत्रांवर म्हाडाचे घर मिळणार..!”

Leave a Comment

Join WhatsApp Group