Mhada Flats : म्हाडाने आता परवडणारी घरे देण्यासोबतच एक पाऊल पुढे टाकत होम लोनचीही (Home Loan) सोय उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे, २५ लाखांपर्यंतच्या घरांसाठी फक्त ४% व्याजदराने कर्ज मिळणार आहे. या योजनेमुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबांसाठी मुंबईत स्वतःचं घर घेणं आणखी सोपं होणार आहे. कमी व्याजदर, सरकारी योजना आणि म्हाडाची विश्वासार्हता या तिन्हींच्या एकत्रित फायद्यामुळे ही संधी खरोखरच गोल्डन ऑपर्च्युनिटी ठरू शकते. मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतींमध्ये म्हाडाची ही योजना अर्जदारांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती..
म्हाडाने रिक्त घरांच्या विक्रीला गती देण्यासाठी नवा पर्याय पुढे आणला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उरलेल्या रिक्त घरांच्या विक्रीस मदत म्हणून गृहकर्जाची विशेष सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यासाठी एका खासगी वित्तीय संस्थेला नियुक्त करण्यात आले असून, ती संस्था अर्जदारांना २५ लाखांपर्यंतच्या घरांसाठी फक्त ४% व्याजदराने कर्ज देणार आहे. अतिशय कमी व्याजदरामुळे या घरांना मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा म्हाडाच्या कोकण मंडळाने व्यक्त केली आहे.
कोकण मंडळाच्या हद्दीत हजारो घरे अद्यापही रिक्त पडून आहेत. विरार–बोळींज, खोणी, गोठेघर, शिरढोण, भंडार्ली, ठाणे, कल्याण अशा अनेक ठिकाणांतील प्रकल्पांचा यात समावेश होतो. रिक्त घरे विक्रीसाठी ‘बुक माय होम’ या प्लॅटफॉर्मवर फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह तत्त्वावर विक्री सुरू केली असली, तरी प्रतिसाद मर्यादितच आहे. दरम्यान, पुढील सहा महिन्यांत ही घरे विकून टाकण्याचे लक्ष्य मंडळाने निश्चित केले आहे. सध्या १२ हजारांपेक्षा अधिक घरे रिक्त असून त्यापैकी जवळपास ८ हजार घरे पीएमएवाय योजनेअंतर्गत येतात. गोठेघर, भंडार्ली, शिरढोण, खोणी आणि विरार–बोळींज येथील ही घरे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
येथे वाचा – म्हाडाची बंपर स्कीम! 14 लाखाच्या फ्लॅट्ससाठी धडाकेबाज लॉटरी सुरू..
विक्रीला गती देण्यासाठी म्हाडाने आता अर्जदारांना म्हाडामार्फतच गृहकर्जाची सोय देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी हरियाणास्थित TENB Fintech Private Limited या खासगी वित्तीय संस्थेची निवड करण्यात आली असून, संस्थेला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून पीएमएवाय घरांसाठी गृहकर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली.
येथे वाचा – म्हाडाची बंपर स्कीम! 14 लाखाच्या फ्लॅट्ससाठी धडाकेबाज लॉटरी सुरू..
पीएमएवाय योजनेनुसार २५ लाखांपर्यंतच्या घरांसाठी ४% व्याजदराने गृहकर्ज देण्याची तरतूद केंद्र सरकारकडून असली, तरी प्रत्यक्षात कोकण मंडळातील घरांसाठी कोणतीही बँक हा लाभ देत नसल्याचे समोर आले आहे. परिणामी, कमी व्याजदराचा फायदा न मिळाल्याने अनेक अर्जदारांना ही घरेही परवडेनाशी ठरत होती आणि त्यामुळे त्यांनी पीएमएवाय प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले. मात्र आता परिस्थिती बदलणार आहे. कोकण मंडळाने पीएमएवाय घरांसाठी नियुक्त खासगी संस्थेमार्फतच ४% व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे ८ हजार रिक्त घरे विक्रीला चालना मिळेल, असा मंडळाचा विश्वास आहे.