शेतकऱ्यांनो पहिल्या फवारणीतच वाढवा फुटवा, मावा नियंत्रणासाठी तज्ञांचे मार्गदर्शन!

Gahu favarni niyojan: शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामात गव्हाचं भरघोस उत्पादन घ्यायचं असेल तर पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील फवारणी ही अत्यंत निर्णायक ठरते. अनेक शेतकरी मित्रांना अजूनही पहिली फवारणी कधी, कशी आणि नेमकी कोणती घ्यावी याबाबत स्पष्ट माहिती नसते. पण खरी गोष्ट अशी की गहू पिकासाठी 30 दिवसाच्या आसपास करण्यात आलेली पहिली फवारणी पुढील उत्पादनासाठी महत्वाची ठरते. विशेषतः सध्याच्या ढगाळ, धुरकट आणि थंड वातावरणात मावा, थ्रिप्स, बुरशीजन्य रोग यांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने ही फवारणी अत्यंत महत्त्वाची ठरते.

तणनाशक मारून पिकाला पाणी दिल्यानंतर, जेंव्हा शेत वापसा स्थितीत म्हणजेच योग्य ओलाव्यात येते, त्याच वेळी ही फवारणी केल्यास तिचा परिणाम अधिक प्रभावी दिसतो. गव्हामध्ये उत्पादन वाढवण्याचा मुख्य आधार म्हणजे फुटवा (Tillering). फुटवा चांगला निघाला नाही तर पिकाची घनता कमी होऊन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटते. म्हणूनच पहिली फवारणी ही फुटवा वाढवणे + पोषण पुरवठा + किडींचे नियंत्रण अशा तिहेरी उद्दिष्टांनी केली जाते.

यासाठी सर्वप्रथम 12:61:00 हे पाण्यात सहज मिसळणारे खत वापरणे फार फायदेशीर ठरते. ज्या शेतात जमिनीचा pH लेवल जास्त आहे आणि दाणेदार खतांचं शोषण मंद गतीने होतं, अशा शेतात फवारणीद्वारे दिलेलं हे खत थेट पानांमधून शोषलं जातं आणि पिकाला त्वरित फॉस्फरस मिळतो. हा फॉस्फरस गव्हाच्या जाड फुटव्यांसाठी आणि पुढे येणाऱ्या ओंब्यांच्या गुणवत्तेसाठी कणा बनतो.

फुटवा वाढीसाठी ऑक्झिन + सायटोकायनिन असलेले संजीवक (उदा. Challenger किंवा समान प्रकारचे टॉनिक) मिसळणे अत्यावश्यक आहे. ही हार्मोन्स पिकात नवीन फुटवा निर्माण करण्याची क्षमता वाढवतात, जुने फुटवे ताकदवान करतात आणि पिकाचं एकूण वाढीचं स्वरूप सुधारणारे असतात. साधारण 7 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी हे टॉनिक पुरेसं प्रमाणात असतं.

गेल्या काही दिवसांतील हवामानामुळे गहू पिकावर काळ्या माव्याचा (Black Aphid) प्रादुर्भाव वेगाने वाढण्याचा धोका आहे. मावा रस शोषून पिकाचं नुकसान करतोच, शिवाय चिकट रस तयार करून ऊर्मीक (Sooty Mold) निर्माण करतो, ज्यामुळे पानं काळपट होतात आणि प्रकाश संश्लेषण क्षमता कमी होते. म्हणूनच Rogor, Chloropyriphos किंवा समान प्रभावी कीटकनाशक 30 मि.ली. प्रति 15 लिटर पाण्याने मिसळून वापरणे अत्यंत गरजेचे ठरते.

एकूणच, या पहिल्या फवारणीत 12:61:00 + फुटवा टॉनिक + कीटकनाशक या तिन्हींचा संयोग अत्यंत महत्त्वाचा आहे. ही फवारणी खर्चाने स्वस्त असली तरी परिणाम मात्र अत्यंत जबरदस्त देणारी आहे. या फवारणीमुळे पिकावर तजेला येतो, फुटवा मोठ्या प्रमाणात वाढतो, माव्याचा धोका कमी होतो आणि पुढील वाढीसाठी पीक मजबूत पाया तयार करते.

Leave a Comment

Join WhatsApp Group