राज्यातील हवामानाबाबत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आपला नवीन अंदाज वर्तवला असून, त्यानुसार राज्यात पुढील काही दिवस संमिश्र हवामान पाहायला मिळणार आहे. दरवर्षीच्या पॅटर्ननुसार २ ते ७ डिसेंबर हा आठवडा अवकाळी पावसाचा मानला जातो, मात्र यंदा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे डख यांनी स्पष्ट केले आहे.
कुठे आहे पावसाची शक्यता?
सध्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले आहे. ३ ते ५ डिसेंबर या काळात तिथे पाऊस पडेल. साहजिकच, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागांवर होणार आहे. सोलापूर (विशेषतः अक्कलकोट, जत), सांगली, कोल्हापूरमधील शिरोळ, सातारा, पुण्याचा दौंड भाग आणि बीडमधील आष्टी-कडा या पट्ट्यात ढगाळ वातावरण राहील. काही मोजक्या गावांमध्ये पावसाचे किरकोळ थेंब पडू शकतात, मात्र मोठा पाऊस होणार नसल्याने शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे.
विदर्भ-कोकणात हवामान कसे राहील?
पूर्व आणि पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही. ६ डिसेंबरपासून आकाशातील ढग हटून वातावरण पूर्णपणे स्वच्छ होईल आणि त्यानंतर राज्याला पुन्हा हुडहुडी भरवणारी थंडी जाणवू लागेल.
शेतकऱ्यांसाठी पीक सल्ला:
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे दिवसादेखील पिकांवर ‘धुई’ (दव) साचलेली दिसेल. याचा फटका फळबागांना बसू शकतो.
फळबाग: नाशिक, सांगली, सोलापूर भागातील द्राक्ष, डाळिंब आणि वेलवर्गीय पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी धुईमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती फवारणी करून घ्यावी.
रब्बी पिके: हरभरा उत्पादकांनी पिकाला पाणी देण्यास सुरुवात करावी. तसेच ज्यांची गहू पेरणी बाकी आहे, त्यांनी १० डिसेंबरपर्यंत पेरणी उरकून घ्यावी. तुरीच्या पिकासाठी मात्र हे वातावरण पोषक ठरू शकते.
थंडीचा मुक्काम वाढणार
डिसेंबरच्या सुरुवातीला रात्रीचे तापमान ११ ते १२ अंशांवर स्थिर असले, तरी ६ डिसेंबरनंतर खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी सुरू होईल. हा थंडीचा जोर १० जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे संकेत पंजाबरावांनी दिले आहेत. वातावरणात अचानक काही बदल झाल्यास तत्काळ नवीन अपडेट दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.